........तेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’

……..तेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’

Posted by: Nitin Potdar
Category: Pragaticha Express Way, Uncategorized
एक जुना दिवाळी अंक चाळत असताना एका नानखटाई बनविणाऱ्या मराठी बेकरी मालकाची छोटेखानी मुलाखत वाचायला मिळाली.   वयाच्या १० वर्षांपासून भट्टीपुढे उभं राहून काम करीत पुढे स्वत:ची बेकरी त्याने कशी थाटली आणि यश कसं संपादन केलं हे त्यांनी त्यात सविस्तर सांगितलं होतं. मुलाखतीत पुढे त्यांनी अभिमानाने सांगितलं की, प्रत्येक दिवाळीच्या सणासुदीला ते अजूनही १२ ते १५ तास सलग भट्टीसमोर उभे राहतात. संपूर्ण कुटुंब त्यांच्याबरोबर मेहनत करतं आणि भरपूर पैसे कमावतात. त्यांची दोन्ही मुलं आज त्यांच्याबरोबर मेहनत करतात, त्याचं त्यांना फार कौतुक वाटतं. पण त्यांची एक मोठी खंत आहे आणि ती म्हणजे त्यांना एक ग्लुकोज बिस्किटे बनविण्याची छोटीशी फॅक्टरी टाकायची होती. तसेच त्यांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ज्वारीचा ब्रेड बनवायचा होता! शाळेच्या मुलांसाठी त्यांना मधल्या सुट्टीसाठी एक पौष्टिक डबा बनवायचा होता! पण.. हे सगळं त्यांचं स्वप्न स्वप्नच राहिलं. कारण त्यांना बेकरीच्या रोजच्या व्यापातून बाहेर पडताच आलं नाही. हे असं का व्हावं? कारण त्यांनी बेकरीचा उद्योग सुरू केला. पण ते स्वत: त्यांच्याच बेकरीत आयुष्यभर भट्टीपुढे नोकरीच करीत राहिले! शून्यातून सुरुवात करून या बेकरीच्या मालकाने उद्योग वाढवला पण एका मर्यादेपर्यंतच. चांगल्या नवीन कल्पना त्यांच्याकडे होत्या, इच्छा होती, पण ते झेप घेऊ शकले नाहीत. का? कारण ‘डेलिगेशन’ हा शब्दच त्यांना माहीत नव्हता. जे त्यांच्या बाबतीत घडलं तेच काही प्रमाणात उच्चशिक्षित उद्योजकांच्या बाबतीतही निदर्शनास येते. डेलीगेशनअभावी आपल्या उद्योगातील सर्व कामं ते स्वत:च करत असतात आणि उद्योगविस्तार हे महत्त्वाचं कामं मात्र बाजूला राहतं. हा खरोखरच गंभीर विषय आहे. असं का होतं, त्यातून बाहेर कसं पडायचं हे नीटपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
असे अनेक उद्योजक आणि व्यावसायिक आहेत की त्यांच्या व्यवसायात रिसेप्शनपासून ते बँकिंगपर्यंत सगळी कामं ते स्वत: करतात आणि तसं करण्यात ते इतके गुंतून पडतात की ग्राहकांना व्हॅल्यू अ‍ॅडिशन तर सोडा, साधी अपेक्षित सव्‍‌र्हिससुद्धा त्यांना धड देता येत नाही! सांगलीचे एक उद्योजक त्यांच्या सीएकडे बोलताना म्हणाले की माझे रोज दोन तास बँकेचे व्यवहार आणि चेक सही करण्यात जातात. तर मी कस्टमरशी कधी बोलू? माझ्या माहितीत असे अनेक उद्योजक आहेत की ज्यांनी स्वत:च्या कौशल्याने आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:चा उद्योग उभारला, एका मर्यादेपर्यंत तो वाढवत नेला, पण त्याचा खऱ्या अर्थाने विस्तार करायला त्यांना सवडच झाली नाही. मग प्रतिस्पर्धी उद्योजकांच्या विस्ताराकडे हतबलतेने बघत राहणं आणि मनात सगळं असूनही कुठेतरी निराशा येणे अशी त्यांची अवस्था झाली.

बऱ्याच प्रमाणात छोटे उद्योजक हे त्यांच्या प्रॉडक्ट्सचं उत्पादन स्वत: करतात, तेच कच्चा माल विकत घेतात, तेच लेबलिंग, पॅकेजिंग ठरवतात आणि स्वत: जातीनं मार्केटिंग करतात. त्याचबरोबर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि रोजची किरकोळ कामंसुद्धा तेच करतात. जवळपास उद्योगाचं प्रत्येक डिपार्टमेंट ते स्वत: सांभाळतात. म्हणजे ते आपल्याच उद्योगात पूर्णवेळ ‘नोकरी’ करतात! याची दोन मुख्यं कारणं दिली जातात. (१) सुरुवातीपासून सर्व व्यवहार एकाच व्यक्तीने सांभाळल्यामुळे त्यांनी त्या कामासाठी इतर व्यक्तींचा कधी विचारच केलेला नसतो, किंवा (२) त्यांना त्यांच्यासारखीच काम करणारी अनुभवी आणि विश्वासाची माणसं मिळतं नसल्यामुळे त्यांनी कुणाला घेतलेलं नसतं. वरील दोन्ही कारणं बऱ्याच अंशी खरी असू शकतात, नव्हे अगदी १०० टक्के खरी असू शकतील. पण आपल्या मनासारखी किंवा अनुभवी माणसं मिळत नाही म्हणून आपण एकच काम आयुष्यभर करत राहणार का? आणि मुख्य म्हणजे आपण जर एकच काम आयुष्यभर करत राहिलो तर आपल्यानंतर व्यवसायाचे काय होणार? व्यवसाय वाढवायचा कोणी आणि कसा? या मूलभूत प्रश्नांचा विचार कोण करणार? काही मालक आपण रोजच्या कामात किती hands on आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात, पण हे करताना त्यांच्यातल्या उद्योजकाला ते रोज मारत असतात. कित्येक कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या किंवा मॅनेजमेंटच्या मीटिंग्समध्ये क्षुल्लक गोष्टींवरून तासन्तास चर्चा होते! एखाद्या कंस्ट्रक्शन कंपनीचा मालक हेवी डय़ुटी मशीनरी विकत घेण्याचा निर्णय एका मिनिटात घेतो, पण रिसेप्शनला लागणारे आधुनिक फोन, चांगला सोफा किंवा साधं झेरॉक्स मशीन घेण्यावरून ऑफिसच्या मॅनेजरला कित्येक महिने ताटकळत ठेवतो, निर्णय घेऊ देत नाही. म्हणून कामाचं नीट ‘डेलिगेशन’ होणं गरजेचं आहे. उद्योग सुरू करतेवेळी काम करणं समजून घेता येईल, पण एकदा सुरू झाल्यानंतर उद्योजक या नात्याने आपण सर्वप्रथम आपल्या मदतीला योग्य माणसं निवडून उद्योगाला स्वत:च्या पायावर समर्थपणे उभं करणं गरजेचं आहे. काही काळानंतर प्रत्येक गोष्टीकडे एका व्यावसायिक दृष्टीने बघणं फार गरजेचं आहे.

इथे मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे. काही उद्योजक विस्ताराचा विषय आला की ते नेहमी दोन सबबी सांगतात (१) उद्योग वाढवला तरी तो सांभाळायला घरात जास्त माणसं नाहीत, काय करणार? आणि दुसरे म्हणजे (२) आमच्या उद्योगात आता ‘राम’ राहिलेला नाही! आम्ही खस्ता खाल्ल्या इतक्या पुरे, आता आमच्या पुढच्या पिढीने स्वत:चं वेगळं काहीतरी करावं असं त्यांना सतत वाटत असतं. अशी मानसिकता आणि वैराग्याची भावना मनात निर्माण व्हायला अनेक कारणे असू शकतात. पण त्याचं मुख्य कारण म्हणजे योग्य वेळेस न केलेले डेलिगेशन! कित्येक वेळा तेच ते काम करून थकवा येऊ शकतो, कंटाळा येऊ शकतो आणि त्यामुळे उद्योगाला चांगले भवितव्य असलं तरी उद्योग वाढविण्याच्या दृष्टीने कुठलीच पावले पडलेली नसतात, विस्ताराच्या सर्व कल्पना मनातल्या मनातच राहून गेलेल्या असतात. म्हणून आपण जे काम करीत असू ते काम करण्यासाठी लवकरात लवकर योग्य माणसे नेमून त्यांच्याकडे आपल्या कामाचं योग्य डेलिगेशन करता आले पाहिजे. स्वत:ला आपण करीत असलेल्या कामापासून थोडे वेगळे करता आले पाहिजे. काही गोष्टी या आपल्याच हातात ठेवाव्या लागतील हेसुद्धा तितकेच खरे. पण व्यवसायाला लागणारी योग्य टीम उभी करावीच लागणार! मी इथे मेहनत करू नये असं मुळीच म्हणत नाही. सुरुवातीच्या काळात माणसं परवडलीसद्धा पाहिजे, हे मान्य. पण योग्य वेळ येताच आपणच आपलं प्रमोशन नको का करायला? कारण शेवटी आपल्या उद्योगाची ‘दशा’ बदलायची असेल तर तिला योग्य ‘दिशा’ देण्यासाठी तरी आपल्याला आपली नोकरी नको का सोडायला?

खरं तर कामाचे डेलिगेशन म्हणजे आपण आपलं काम सोडणं नव्हे! तर आपण करीत असलेल्या कामासाठी निर्माण केलेली सपोर्ट सिस्टिम! आपले काम आपल्या देखरेखीतच होत असते. आपल्या मनाप्रमाणेच होत असतं, पण ते आपण न करता इतरांकडून करून घेत असतो. डेलिगेशनचा फायदा म्हणजे (१) आपल्या कामाचे आपल्यालाच वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करता येते, त्यात सुधारणा सुचवता येतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे (२) रोजच्या कामातून आपली मुक्तता झाली तर आपण आपला अमूल्य वेळ व्यवसायाच्या इतर मुख्य कामासाठी देऊ शकतो. डेलिगेशनसाठी चांगली माणसं मिळत नसली तर शिकाऊ मुलं घेऊन त्यांना शिकवून तयार केलं पाहिजे. अशी शिकाऊ मुले शिकतील आणि जातीलसुद्धा. पण हा एक प्रवास आहे असं समजले पाहिजे. चांगली माणसं कशी टिकवावी हा एक वेगळा विषय आहे तो आपण नंतर पाहू. सुरुवातीला लहान कामांच्या डेलिगेशनने सुरुवात करायला काहीच हरकत नसावी. अजूनही कित्येक मोठय़ा उद्योगांमध्ये बऱ्याच क्षुल्लक गोष्टींसाठी मालकांची परवानगी घ्यावी लागते. मग जर मालक नसतील तर निर्णय होत नाहीत आणि नुकसान होतं ते व्यवसायाचं. आपल्या कर्मचाऱ्यांचं नव्हे हे आपण लक्षातचं घेत नाही. एक प्रयोग म्हणून आठ दिवस आपल्या कार्यालयात न जाता, सरळ सुट्टी घ्या आणि तुम्ही तुमचा उद्योग किंवा व्यवसाय दुप्पट करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून बघा, प्लॅनिंग करा! त्या आठ दिवसांत ऑफिसमध्ये साधा फोनसुद्धा करू नका! इतरांवर जबाबदारी टाकून तर बघा! काही गोष्टी तुमच्या मनासारख्या झालेल्या नसतीलही, पण निदान तुमच्या मनात व्यवसाय दुप्पट करण्याचं संपूर्ण प्लानिंग तयार झालेलं असेल!

उद्योजक म्हणून त्याचं खरं काम आहे, उद्योगाविषयी मूलभूत धोरणं ठरवणं, उत्पादन व त्याचा दर्जा वाढवणं, विस्ताराच्या योजना आखणं, आव्हानांचा मुकाबला करणं, नव्या कोणत्या क्षेत्रात जाता येईल याचा विचार करणं. उद्योजक म्हणून हे करण्याऐवजी आपण जर किरकोळ कामे करत राहू तर आपल्या उद्योगाची वाढ कशी होणार? कुठलाही उद्योग वाहून नेणारी चार चाकं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, फायनान्स आणि ह्य़ुमन रिसोर्स. उद्योगाचे मालक म्हणून आपण आपला उद्योग कसा असायला पाहिजे. हे ठरवायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, पण वर दिलेल्या चारही विषयांत एकच व्यक्ती तज्ज्ञ असू शकत नाही. कुठल्याही उद्योगाच्या मोठय़ा यशाची भिस्त असते त्याच्या कॅप्टनवर. पण त्याचा अर्थ हा नाही की त्यानेच सर्व कामे करावीत. उलट रुटीन, किरकोळ कामातून स्वत:ला मुक्त करून उद्योगाच्या मूलभूत समस्यांचा सविस्तर विचार होणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळात कॅप्टननेच दमदार फलंदाजी करावी, भेदक गोलंदाजीसुद्धा त्याने करावी आणि चपळ क्षेत्ररक्षणसुद्धा त्यानेच करावं ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे. संघाचं यश हे फक्त कॅप्टनच्या फलंदाजी किंवा गोलंदाजीवर अवलंबून नसतं, तर तो त्याची टीम कशी बनवतो आणि वापरतो यावर सर्वस्वी अवलंबून असतं. प्रत्येक हुशार कॅप्टन सर्वप्रथम चांगली टीम तयार करतो! म्हणून खऱ्या अर्थाने यशस्वी कॅप्टन होणं गरजेचं आहे!

महाराष्ट्रातले काही हरिश्चंद्र फॅक्टरी टाकतात, पण जन्मभर नोकरी सोडतच नाही! अशा सर्व उद्योजकांनी येत्या १ मे रोजी महाराष्ट्रदिनाच्या शुभ मुहूर्तावर एका निश्चयाने आपल्या फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून महाराष्ट्राच्या उद्योगजगतात एक आदर्श निर्माण करावा ही सदिच्छा!

सौजन्य लोकसत्ता अर्थ वृतान्त (Express Money) दि. १८ एप्रिल २०१०.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=63343:2010-04-18-15-50-46&catid=127:2009-08-06-07-25-02&Itemid=139

Nitin Potdar
Author: Nitin Potdar

Leave a Reply

Please Ask Your questions

1 Comment

This website uses cookies and asks your personal data to enhance your browsing experience.