भांडवल उभारणी! एक यक्षप्रश्न?

भांडवल उभारणी! एक यक्षप्रश्न?

Posted by: Nitin Potdar
Category: Pragaticha Express Way, Uncategorized

उद्योजक लहान असो की मोठा, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असो की सव्‍‌र्हिस सेक्टर, उद्योगाचा सुरुवातीचा काळ असो की ५० वर्षांनंतरचा, कुणाच्याही पोटात गोळा आणणारा असा एकच शब्द आहे आणि तो म्हणजे भांडवल! अगदी साध्या अगरबत्ती किंवा केळी विकणाऱ्याला लागणारं २०० रुपयांचंसुद्धा भांडवल असो की टाटा, बिर्ला किंवा अंबानी ग्रुपचा विस्तार असो! कितीही मोठा ग्रुप असला तरी त्यांना भांडवल उभारताना प्रत्येक वेळी घाम फुटतोच!

भांडवल उभारणीचे विविध मार्ग म्हणजे प्रायव्हेट इक्विटी, पब्लिक इश्यू, बँक फायनान्स आणि सरकारी योजना. प्रत्येक मार्ग एक स्वतंत्र विषय आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या भांडवल उभारणीपासून ते विस्ताराच्या योजना आखेपर्यंत उद्योजकाची मानसिकताही प्रसंगानुरूप बदलत जाते. त्यात सुरुवातीचा काळ हा ‘राहू’ काळ समजला जातो, म्हणून त्याबद्दल आज विचार करूया.

सुरुवातीला प्रत्येकालाच असं वाटत असतं की, त्याचा प्रोजेक्ट फायदेशीर आहे. एकदम हिट आणि म्हणून कुठल्या तरी बँकेने, नातेवाईक, मित्र, ज्ञातीसंस्थेने किंवा इतर कुणी तरी पुढे येऊन लागणारं भांडवल पुरवलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. अगदी सुरुवातीला लागणारे लाख-दोन लाखच काय, काही हजारसुद्धा कुणी देत नाही. मग हे पैसे आपले आपल्यालाच उभे करावे लागतात. कुणी आपले दागिने विकतो, घर गहाण ठेवतो, जास्त व्याजाने पैसे उधार घेतो आणि उद्योगाची सुरुवात होते. आपल्याला नको नको त्या लोकांपुढे हात पसरावे लागतात. लोकांची मदत करायची ताकद असते, पण मानसिकता नसते. आपल्या शब्दाची खरी किंमत आपल्याला तेव्हा कळते आणि म्हणून बऱ्याच वेळा ‘स्वाभिमान’ गहाण ठेवावा लागतो. शंभर प्रश्न तेही तिरकस. उत्तर देणारे फक्त तुम्ही एकटे. या कसोटीच्या काळात प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असते. पण अशा अग्निपरीक्षेतून सगळ्यांनाच जावं लागतं, त्यात नवीन असं काहीही नाही. आज हा लेख वाचतानासुद्धा कित्येकांना पहिलं ‘भांडवल’ उभारताना त्यांनी काय ‘यातना’ भोगल्या असतील हे आठवून नकळतपणे त्यांचे डोळे पाणावतील यात शंका नाही. होय ‘यातना’ हाच शब्द बरोबर आहे!
मग प्रश्न असा आहे की, भांडवल नाही म्हणून कुणी उद्योग सुरूच करू नये का? मोठं होण्याची स्वप्नं बघूच नयेत का? हा चक्रव्यूह कसा फोडावा? मला वाटतं, त्यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा मराठी सिनेमा किमान दोनदा तरी बघितलाच पाहिजे. स्व. दादासाहेब फाळके यांनी ९६ वर्षांपूर्वी काय केलं? त्यांना तेव्हा कुणी मदतीचा हात दिला? त्यांना कुणी मार्गदर्शन केलं, त्याचा नीट अभ्यास झालाच पाहिजे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशींनासुद्धा जवळपास तेच करावं लागले. त्यांनी सुध्दा चित्रपट निर्मितीसाठी आपले राहते घर गहाण टाकले होते. इन्फोसिस- भारतातील आघाडीची आयटी कंपनी- तिचे संस्थापक नारायण मूर्ती यांना उद्योगाची सुरुवात करतेवेळी त्यांच्या पत्नीने म्हणजे श्रीमती सुधा मूर्ती यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून रुपये १०,०००/- दिले तेव्हा इन्फोसिस नावाची पाटी अस्तित्वात आली. मोबाईल कंपनी भारती एअरटेलचे संस्थापक सुनील मित्तल यांना त्यांच्या वडिलांनी सुरुवातीलाच भांडवल म्हणून रुपये ७०,०००/- दिले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक स्व. धीरूभाई अंबानींचा जन्म एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरी झाला आणि नऊ वर्षे येमेन येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम केल्यानंतर रुपये १५,०००/- च्या भांडवलावर रिलायन्स टेक्स्टाइल्स ही कंपनी सुरू झाली. उद्योगपती गरवारे, किर्लोस्कर, कॅम्लिनचे दांडेकर, विकोचे पेंढारकर, पुण्याचे डी.एस. कुलकर्णी अशी असंख्य उदाहरणं आहेत की, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. जवळजवळ प्रत्येक उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने, मग तो कुठल्याही समाजाचा असो किंवा प्रांताचा. सुरुवातीला लागणारं भांडवल स्वत:च्या अपार कष्टाने, मेहनतीने, प्रसंगी स्वत:ला गहाण ठेवून उभं केलं आणि यश खेचून आणलं. कुणालाही लॉटरी लागल्याची माहिती माझ्या ऐकिवात नाही!

सुरुवातीचं भांडवल हे मित्र, ज्ञातीसंस्था आणि नातेवाईकांशिवाय एखादी बँक किंवा सरकारच्या एखाद्या योजनेद्वारे मिळू शकतं. अशी मदत काही वेळा तुटपुंजी असू शकते आणि अशा भांडवलासाठी आपल्याला विविध बँकांत किंवा सरकारदरबारी पुन:पुन्हा जावं लागतं, खेटे घालावे लागतात, त्यांचं पेपर वर्क करता करता दमछाक होते, पण त्याला पर्याय नाही. बँक किंवा सरकारी योजना म्हटलं की, आपल्यापैकी बहुतेक लोक तिथं जाण्याआधीच हात-पाय गाळतात आणि आपलं काम होणार नाही अशी मानसिकता आणि डोक्यात शंभर शंका घेऊन निराश मनाने तिथली पायरी चढतात. मला वाटतं हे बँकिंग क्षेत्राचं सगळ्यात मोठं अपयश आहे. आपलाही दृष्टिकोन खूपच निगेटिव्ह असतो. बँक ऑफिसरने विचारलेला प्रत्येक प्रश्न आपण आपला अपमान करण्यासाठीच विचारलेला आहे, असं समजतो आणि आपल्या उद्योगाविषयी कुठलीही चौकशी म्हणजे आपल्यावर दाखवलेला अविश्वासच आहे हे गृहीत धरतो. मागितलेली माहिती देण्यापेक्षा ती उपयोगाची कशी नाही हे पटवून देण्याचा आपला प्रयत्न असतो. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून भेटायला थोडा उशीर झाला तरी आपण उगीच नव्‍‌र्हस होतो. योग्य प्रोजेक्टला पैसे मिळालेच पाहिजे हे जितकं खरं असलं तरी प्रत्येक प्रोजेक्ट हा बँकेच्या चौकटीत बसलेच असं गृहीत धरणं चुकीचं आहे. शेवटी बँक चालवणं म्हणजेसुद्धा एक उद्योगच आहे, हे आपण पूर्णपणे विसरतो!

मला वाटतं की अजूनही बँक आणि होतकरू उद्योजक यांच्यात एक मोठी दरी आहे आणि ती मिटविण्यासाठी बँकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. एकूणच बँकेचे कार्यक्षेत्र आणि काम करण्याची पद्धत एक साधारण सावकारापेक्षा वेगळी असायला हवी. पण तसं होताना दिसत नाही. बँकांनी किमान अशा कामावर अनुभवी कर्मचाऱ्यालाच नियुक्त केलं पाहिजे की जो नवीन उद्योजकाला विश्वासात घेऊन सगळे सोपस्कार त्याच्या भाषेत समजावून देईल. बँकांनी वृत्तपत्रांतून लाखो रुपयांच्या जाहिराती करण्यापेक्षा त्यांच्या वेबसाइटवरून बँकेत जाताना साधारण कुठले पेपर्स बरोबर आणले पाहिजेत याची यादी घेणं गरजेचं आहे. आज वेबसाइटवरून छोटय़ा व्हिडीओद्वारा लोकांशी थेट संपर्क साधला जाऊ शकतो. कर्ज घेणाऱ्यांसाठी सोप्या आणि मुख्य म्हणजे आपुलकीच्या शब्दात माहिती का दिली जात नाही हे मला पडलेलं मोठं कोडं आहे. (उदाहरणार्थ, सारस्वत बँकेच्या जनरल मॅनेजर श्रीमती उर्वशी धराधर ज्या एस.एम.ई. लोनच्या इनजार्च आहेत. त्या उद्योजकांशी थेट संपर्क साधतात, त्यांचा सेल नंबर ९८२०५०६०६३ चक्क त्यांनी बँकेच्या वेबसाइटवरच दिलेला आहे.)

बऱ्याच वेळा कर्जासाठी लागणारे पेपरवर्क बघून खास करून वैयक्तिक हमीचे पत्र बघून उद्योजकांच्या मनात थोडी भीती वाटू शकते. अशी पत्रं प्रत्येक उद्योजकाकडून घेतली जातात. उद्योजकांनी कर्जासाठी लागणारे तारणाच्या पेपर्सवरून वाद करण्यापेक्षा घेतलेल्या कर्जावर व्याजाचा चांगला दर मिळावा यासाठी चर्चा करायला पाहिजे. कर्जाचा हप्ता फेडण्यास मॉरोटोरीयम म्हणजे सुरुवातीचे हप्ते फेडण्यात सूट मिळविली पाहिजे. डिफॉल्ट व्याजदर लगेच लागू नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ही प्रक्रिया थोडी जिकरीची असली म्हणून उद्योजकाने बँकेची किंवा सरकारी योजनेची मदत घ्यायची नाही का? मी म्हणेन, अशी मदत घ्यायलाच पाहिजे. कित्येक उद्योजक कोण कुठलं कर्ज देऊ शकतं याची संपूर्ण माहितीदेखील मिळवीत नाहीत. गरज आपल्याला आहे म्हटल्यावर मनात कुठलाही किंतू न ठेवता तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून चिकाटीने उगीच प्रतिष्ठेचा प्रश्न न करता बँक किंवा सरकारी योजनेच्या मागे लागून मदत घेतली पाहिजे. अशा वेळी मागे हटून चालणार नाही. संयमाने, शांतपणे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. यश इथंच आहे!

मला वाटतं की, कुठल्याही प्रकारच्या भांडवल उभारणीचं काम हे प्रोफेशनलीच हाताळलं गेलं पाहिजे. सुरुवातीचं भांडवल असो किंवा नंतरच्या विस्तार योजनेसाठी चांगलं प्रोजेक्ट. रिपोर्ट बनवणं फार गरजेचं आहे आणि अशा कामासाठी एखाद्या प्रोफेशनल संस्थेची किंवा चार्टर्ड अकाऊटंटची मदत घेणं क्रमप्राप्त आहे. चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नुसतं आकडय़ांचा खेळ किंवा कुठल्याही प्रकारचं कागदावर मांडलेलं गणित नव्हे! उद्योगाचं मूळ- प्रोजेक्टच चांगला असला पाहिजे. कित्येक उद्योगांचे व्यवहार रोख पद्धतीने होतात आणि त्याचे व्यवहार हिशोबात येतच नाही. म्हणजे उद्योगाचा टर्नओव्हर जरी काही कोटीत असला तरी कागदावर तो काही हजारांतच दिसतो आणि बॅलन्सशीटवर काहीच नसतं. अशा झीरो बॅलन्सशीटवर बँक कशाच्या जोरावर कर्ज देणार? थोडासा टॅक्स चुकविण्यासाठी आपण रोख रकमेत व्यवहार करतो आणि पुढच्या उद्योगाचं मोठं नुकसान करतो. आपण कित्येक र्वष हिशोबच लिहीत नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाही. सेल्स टॅक्स भरत नाही आणि एकदम बँकेत कर्ज मागायला जातो. करापोटी पैसे जातील, पण भविष्याच्या दृष्टीने होणारा फायदा हा त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त रकमेचा असेल.

उद्योगाला लागणारे भांडवल हे १०० टक्के इक्विटीवर उभं करणं जिकिरीचं असतं. सुरुवातीच्या काळात कित्येकांना तसं करावंदेखील लागत असेल, पण नंतरचा विस्तार हा योग्य प्रमाणात कर्ज घेऊन करायला काहीच हरकत नसते. नव्हे तो तसाच करायला पाहिजे. जगात कुठलाच उद्योग हा कर्जाशिवाय मोठा झालेला नाही. कर्जाचे पैसे उद्योगात वापरले म्हणजे झालं. तसं असलं तरी मराठी उद्योजक कर्ज घ्यायला फारसे उत्सुक नसतात. कर्ज म्हणजे एक डोक्यावरची मोठी जबाबदारी, जिवाला घोर अशी समजूत आपल्यात आहे. कर्जाच्या नावाने कर्ज देणाऱ्याची झोप उडण्यापेक्षा कर्ज घेणाऱ्याचीच झोप आधी उडते. मारवाडी आणि सिंधी समाजात जितकं मोठं कर्ज तितकी मोठी समाजात त्या उद्योकाची पत असं समजलं जातं. मागे एका कार्यक्रमात उद्योजक जयराज साळगावकर म्हणाले की, मराठी उद्योजकाने गरज नसली तरी थोडंसं कर्ज घ्यावं व कर्जाच्या पैशानेच कर्जाचा हप्ता फेडावा. अशाने निदान कर्ज देणाऱ्या बँकेत तुमची पत वाढते आणि जेव्हा खरोखरच मोठय़ा कर्जाची गरज असेल तेव्हा तुम्ही ताठ मानेने ते मागू शकता. तेव्हा उद्योगात कर्ज घ्यावं लागणं म्हणजे नामुष्की असं मुळीच समजता कामा नये. जगातले कुठलेही उद्योजक असा विचार करीत नाहीत. पैसे उभारण्याची जशी तुमची गरज आहे, तशीच किंबहुना जास्त गरज बँकांना पैसे देऊन व्याज कमावण्याची आहे. म्हणून प्रत्येक उद्योजकाने एका तरी बँकेशी चांगले संबंध प्रस्थापित करायलाच पाहिजे. भूक नसली तरी शिदोरी असली तरी कुठे बिघडलं? आणि समजा कर्ज घेतलं आणि ते वेळेवर परत नाही करता आलं, तर अशा गुन्ह्याला या देशात अजूनपर्यंत कुणालाही फाशीची शिक्षा झालेली माझ्या ऐकिवात नाही.

कुठल्याही उद्योगाची गाडी मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या चार चाकांवर चालविण्यासाठी भांडवल नावाच्या पेट्रोलची गरज पडणारच. मला वाटतं, जसं प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आणि मशिन्स इतरांकडून हप्त्यावर विकत घेतो, ब्रॅण्ड आणि टेक्नॉलॉजीसाठी रॉयल्टी देतो, कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार देतो तसंच उद्योगासाठी लागणारं भांडवल आपण बँकेकडून ठरवलेल्या व्याजावर घेतो असं आपण का समजत नाही? इथं कर्ज घेणं मनाला पटत नाही, असा भावनिक मुद्दा फक्त आपणच उपस्थित करतो. उद्योगाच्या आर्थिक भरभराटीसाठी व्यवहार आणि भावना दूर ठेवल्याशिवाय आपला उद्योग अर्थपूर्ण कसा होणार?

नितीन पोतदार
सौजन्य लोकसत्ता अर्थ वृतांत (Express Money)
सोमवार, २१ जून २०१०

Nitin Potdar
Author: Nitin Potdar

Leave a Reply

Please Ask Your questions

1 Comment

  • हा लेख काल लोकसत्ता मधे वाचला , आणि ताबडतोब बऱ्याच लोकांना फॉर्वर्ड केला.सारस्वत बॅंकेच्या जनरल मॅनेजरचा नंबर दिल्याने निश्चितच बऱ्याच लोकांना फायदा होईल.
    खूप माहितीपुर्ण लेख .

This website uses cookies and asks your personal data to enhance your browsing experience.