‘शांतता, पहाटेपर्यंत कोर्ट चालू आहे’

‘शांतता, पहाटेपर्यंत कोर्ट चालू आहे’

Posted by: Nitin Potdar
Category: Social

 

महाराष्ट्र टाइम्स 6 मे 2018 – मुंबई उच्च न्यायालयात अत्यंत कष्टाळू आणि न्यायदानाच्या कामासाठी स्वतःला झोकून देणारे न्यायमूर्ती म्हणून परिचित असलेले न्या. शाहरुख काथावाला यांनी शुक्रवारी एकप्रकारे इतिहासच घडवला. उन्हाळी सुटी सुरू होण्यापूर्वी अखेरचा दिवस असल्याने जास्तीत जास्त प्रलंबित खटले निकाली काढण्याच्या उद्देशाने त्यांनी शुक्रवारी न्यायालयीन कामांचे तास संध्याकाळी ५ वाजता संपल्यानंतरही दुसऱ्या दिवशी (शनिवारी) पहाटे ३.३० वाजेपर्यंत काम केले. न्यायाधीशांनी सलग १५ तास काम करण्याचा देशातील ही ऐतिहासिक घटना असावी, असे अनेक वकिलांनी मटाला सांगितले.
याआधी वर्षभरापूर्वी एकदा न्या. काथावाला यांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कामकाज सुरू ठेवत कित्येक प्रकरणे निकाली काढली होती. त्याचेही वृत्त मटाने दिले होते. गेल्या आठवड्याभरातही प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांनी किमान दोनवेळा मध्यरात्रीपर्यंत काम केले होते.
मुंबई उच्च न्यायालयातील न्या. शाहरुख काथावाला यांनी शुक्रवारी सुनावणीसाठी सुमारे १६० प्रकरणे आपल्या बोर्डावर लावली होती. त्यातील सुमारे ७० प्रकरणांमध्ये पक्षकार व वकिलांनी तातडीचा दिलासा देण्याची विनंती अर्जांद्वारे केली होती. त्यामुळे अशी सर्व प्रकरणांची सुनावणी घेऊन योग्य तो आदेश देण्यास न्या. काथावाला यांनी प्राधान्य दिले. सकाळी दहापासून कामकाज सुरू केल्यानंतर दुपारी भोजनासाठी केवळ अर्ध्या तासाचा ब्रेकन्यायमूर्तींनी घेतला होता.
त्यानंतर त्यांनी शनिवारी पहाटे ३.३०पर्यंत सलग काम केले. विशेष म्हणजे, त्यांचे सहाय्यक, शिरस्तेदार आदी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही मोलाची साथ दिली आणि तेही पहाटे ४-५च्या सुमारास आपापल्या घरी गेले. पहाटे ३.३०पर्यंत त्या-त्या प्रकरणांत युक्तिवाद मांडणारे अनेक ज्येष्ठ वकील आणि पक्षकारही आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यामुळे इतक्या पहाटे उच्च न्यायालय इमारतीत शुकशुकाट असताना केवळ पहिल्या मजल्यावरील या २० क्रमांकाच्या कोर्टरूममध्ये खच्चून गर्दी होती. याहूनही विशेष बाब म्हणजे पहाटे घरी गेल्यानंतरही शनिवारी पुन्हा सकाळी १०.३० वाजता न्या. काथावाला हे आणखी प्रकरणांची सुनावणी घेण्यासाठी आपल्या चेंबरमध्ये उपस्थित होते.
न्या. काथावाला यांची न्यायदानाच्या कामाप्रती असलेली निष्ठा खरेच वाखाणण्याजोगी आहे. प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या हा देशभर चिंतेचा विषय आहे. अशावेळी त्यांचे प्रयत्न अधिक महत्त्वाचे ठरतात. आमचे प्रकरण शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे पहाटे ३.३० वाजता न्यायालयाबाहेर पडणाऱ्या काही लोकांपैकी आम्ही होतो. विशेष म्हणजे, त्यावेळीही न्यायमूर्ती तितकेच ताजेतवाने वाटत होते. न्यायमूर्तींना साथ देणारे त्यांचे कर्मचारीही प्रशंसेस पात्र आहेत‘, अशी प्रतिक्रिया अॅड. हिरेन कमोद यांनी मटाला दिली. न्या. काथावाला हे पहाटेही तितक्याच प्रामाणिकपणे व ताजेतवाने राहून न्यायदानाचे काम करत होते, हे नक्कीच प्रशंसनीय आहे‘, असे ज्येष्ठ वकील प्रवीण समदानी यांनीही सांगितले.

 

Nitin Potdar
Author: Nitin Potdar

Leave a Reply

This website uses cookies and asks your personal data to enhance your browsing experience.